मुंबई- देशभरात करोनाची दुसरी लाट सुरू आहे. करोनाने अगोदरच अनेकांचे जीव घेतले आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढते आहे. आरोग्य यंत्रणाही दिवसरात्र काम करत आहेत. करोनाच्या या लाटेचा प्रभाव बॉलिवूडवरही झाला आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती. बॉलिवूडप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवरही करोनाचा प्रभाव पडला आहे. तमिळ चित्रपटांमधील लोकप्रिय हास्यकलाकार यांचं आज सकाळी ६ मे रोजी दुःखद निधन झालं. पांडू यांच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पांडू चित्रपटांमध्ये विनोदी पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी पांडू आणि त्यांच्या पत्नी कुमुधा यांना करोनाची लक्षणं दिसू लागल्याने त्यांनी चाचणी केली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने दोघेही चेन्नईमधील एका खाजगी इस्पितळात भरती झाले. अनेक दिवसांच्या उपचारांचा फारसा परिणाम झाला नाही. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पांडू यांच्या पत्नी कुमुधांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. पांडू यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक बड्या कलाकारांनी पांडू यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. पांडू यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अजित कुमार यांच्या 'कढ़ल कोटाई' चित्रपटात हास्यकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. पांडू यांच्या अभिनयाची प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केलं होतं. त्यानंतर पांडू यांनी अनेक चित्रपटात काम केलं. अभिनेता विजयच्या 'घिल्ली' चित्रपटात पांडू यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना त्यांचं विनोदाचं टायमिंग प्रचंड आवडत असे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RuA6c6