मुंबई- बॉलिवूडचे शहेनशहा सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात आणि बर्याचदा आपल्या मनातल्या भावना ते पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करतात. आता, 'फंड रेझिंग' संदर्भात अमिताभ यांनी आपलं मत मांडलं. याबद्दल बोलताना त्यांनी लिहिले की, 'फंड रेझिंग' हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु मी कधीही हे स्वतःहून सुरू करणार नाही, कारण दुसर्यांकडे पैसे मागणे मला लाजिरवाणे वाटते आणि म्हणूनच मी एकट्याने २५ कोटी रुपये दान केले आहेत.' बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सध्या कोविडच्या रुग्णांच्या मदतीसाठी भरपूर देणगी देत आहेत आणि बर्याचदा ते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून यासंबंधी माहिती देत असतात. अमिताभ यांच्याशिवाय अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशनसारखे सेलिब्रिटी फंड उभारणीतून पीडितांच्या मदतीसाठी पैसे जमा करत आहेत. बिग बी यांनी यासंबंधी आपलं मत व्यक्त करताना लिहिले की, 'मी हे कधीही स्वतःहून सुरू करू शकत नाही, कारण मला पैसे मागणे खूप लाजिरवाणे वाटते. म्हणून मी माझ्या मर्यादित माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतो.' अमिताभ यांनी पुढे लिहिले की, 'मी माझ्या देणगीबद्दल माझ्या ब्लॉग किंवा पोस्टमध्ये यासाठी सांगत नाही की लोकांनी माझं कौतुक करावं. पण या माध्यमातून मला खात्री द्यायची आहे की केलेली मदत खरोखर लोकांपर्यंत पोहोचत आहे. इथे 'पोकळ आश्वासनं' दिली जात नाहीत. मी माझ्या मर्यादित माध्यमांतून जे काही शक्य आहे ते करत आहे.' अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये ‘लोक कल्याण’ जाहिरातींबद्दलही लिहिले आहे. ते लिहितात, 'आजवर मी जनहितासाठी केलेल्या जाहिरातींसाठी कुठलेही थेट योगदान मागितले नाही. पण नकळतपणे तसं घेतलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.' दरम्यान, करोना व्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण देश गंभीरपणे त्रस्त आहे. अनुष्का आणि विराट कोहली यांनी आतापर्यंत २ कोटी रुपयांचे योगदान दिले असून त्यांनी सुरू केलेल्या निधी उभारणीने आतापर्यंत ११ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये अखेर लिहिले की, 'आजकाल जेव्हा सर्व गोष्टी सांगून केल्या जात आहेत तर माझं वैयक्तिक योगदान सुमारे २५ कोटींच्या आसपास असेल.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33PaV7e