Full Width(True/False)

१० दिवसांत अभिनेत्रीने गमावले दोन भाऊ, सरकारवर केले आरोप

मुंबई: भारतात करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोक संक्रमित झाले आहे. अनेकांचा मृत्यू झालाय ज्यात बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. तर अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावलं आहे. अशात अभिनेत्री मीरा चोप्रानं मागच्या १० दिवसांमध्ये तिच्या दोन भावांना गमावलं आहे. यामुळे ती दुःखी तर आहेच पण त्या सोबतच सरकारच्या व्यवस्थेवर नाराजही आहे. तिनं सरकारवर गंभीर आरोप करत आपल्या भावांच्या मृत्यूला जबाबदार धरलं आहे. आपली नाराजी व्यक्त करताना मीरा म्हणाली, 'मी माझ्या खूप जवळच्या दोन भावांना करोनामुळे नाही तर सरकारच्या कमकुवत आरोग्य व्यवस्थेमुळे गमावलं आहे. माझ्या पहिल्या भावाला जवळपास दोन दिवस बंगळुरूमध्ये आयसीयू बेड मिळाला नाही आणि दुसऱ्या भावाची ऑक्सिजन पातळी अचानक कमी झाल्यानं त्याचं निधन झालं.' मीराच्या दोन्ही भावांचं वय ४० वर्षांपेक्षा जास्त होतं. भावांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करताना मीरा म्हणाली, 'आम्ही त्यांना वाचवण्यासाठी काहीच करू शकलो नाही हे खूपच निराशजनक आहे. पुढे काय होणार या विचारानं मला आत्ताही सातत्यानं भीती वाटत असते. आयुष्य आपल्या हातातून निसटत चाललं आहे. तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न करूनही तुमच्या आप्तेष्टांना गमावत आहात.' मीरानं सरकारवर नाराजी व्यक्त करताना म्हटलं, 'पहिल्यांदाच मला एवढा राग येतोय कारण आपला देश खोल खड्ड्यात जात आहे असं मला वाटतंय. आम्हाला ऑक्सीजन, इंजेक्शन, औषधं आणि बेडची सोय करायची होती. हे सरकारचं काम होतं. पण ते आपल्याच देशातील लोकांचा जीव वाचवण्यात अयशस्वी ठरले आहेत. मागच्या वर्षी जेव्हा देशात लॉकडाऊन लावण्यात आलं होतं त्यावेळी सरकारनं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला हवं होतं पण त्यांनी हे केलंच नाही ज्याचे परिणाम दुसऱ्या लाटेत पाहायला मिळत आहेत.' मीरान लोकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ती म्हणाली, 'व्हायरस नेहमीच जास्त ताकदीनं परत येतो. आपल्याला प्रत्येकवेळी मास्क वापरण्याची आणि जास्त वेळ गर्दीत न घालवण्याची गरज आहे. हा काळ काही विनोदी नाहीये. आपल्या आजूबाजूला रोज लोक मरत आहेत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xSMZNQ