Full Width(True/False)

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटातील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे डेंटिस्ट

‘मराठी सिनेसृष्टीचं नाव बॉलिवूडमध्येही आदरानं घेतलं जातं. इथल्या आशय-विषयांना मात्र योग्य तो मान मिळायलाच हवा. मराठीत काम करण्यापूर्वीच हिंदीत पदार्पण झालेलं असलं, तरी मी कायमच मातृभाषेतल्या कलाकृतींच्या सन्मानासाठी काम करत राहीन,’ असं म्हणणं आहे ईलाक्षीचं. ईलाक्षी विदर्भातल्या अकोल्याची. तिचं शिक्षणही तिथंच झालं. तिनं काही काळ डेंटिस्ट म्हणून कामही केलं. नृत्याभिनयाच्या आवडीतून मॉडेलिंग क्षेत्रात तिचा प्रवेश झाला. तिथून थेट छोटा आणि मोठ्या पडद्यावर झळकलेली ईलाक्षी फिटनेसबाबत काटेकोर आहे. तिनं शास्त्रीय गायन, मार्शल आर्ट्स याचंही प्रशिक्षण घेतलं आहे. मराठी चित्रपटातल्या पदार्पणाबद्दल काय सांगशील?- ही संधी आणि भूमिका माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. ‘भ्रम’ हा वैभव लोंढेचा चित्रपट वेगळ्या जातकुळीचा आहे. त्याच्यासोबत माझं गाणंही येत आहे. यात मी अभिजित आमकरच्या प्रेयसीची भूमिका करत आहे. एका गुन्हे प्रकरणातल्या संशयितांमध्ये ती असते, अशा आशयाची ही भूमिका आहे. मराठी सिनेसृष्टीचं कौतुक होतं; पण तो मान आणखी मोठ्या प्रमाणावर मिळणं आवश्यक आहे. कलाकार म्हणून हेच माझं ध्येय असणार आहे. ‘तान्हाजी...’ या चित्रपटात तू महाराणींच्या भूमिकेत दिसलीस. या चित्रपटानं काय दिलं?- भूमिकेच्या लांबी-रुंदीपेक्षा ज्या पद्धतीनं हा चित्रपट तयार झाला, ती प्रक्रिया अनुभवणं हीच मोठी शिकवणी ठरली. एकाहून एक दिग्गज असे सहकलाकार, उत्तम निर्मितीमूल्यं, सेटवर सतत सळसळत्या ऊर्जेनं वावरणारी टीम, चित्रपटाचा विषय, ते पेहराव, संवाद आणि मुळात आपण महाराणींच्या भूमिकेत आहोत हा अभिमान, या सगळ्यानं कलाकार म्हणून असणाऱ्या जबाबदारीची जाणीव झाली. या चित्रपटामुळेच मला पुढचं काम मिळालं आहे. ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटात श्रेयस तळपदेबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे?- पहिल्या लॉकडाउनंतर जेव्हा अनलॉक झालं, तेव्हा या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. या चित्रपट चित्रपटगृहांतच प्रदर्शित होण्यासाठी तयार झाला आहे. तो केव्हा प्रदर्शित होईल, याची मीही वाट पाहत आहे. जेव्हा सर्व काही ठीक होईल तेव्हा तो प्रदर्शित व्हावा, असं वाटतं. श्रेयसबद्दल बोलायचं, तर अतिशय शांत आणि संयमी, सहकलाकारांना समजून घेणारा आणि चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करणारी व्यक्ती म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल. सोशल मीडियावरचा वावर, छोटा आणि मोठा पडदा, सीरीजची गणितं, चर्चेत राहणं, सतत चांगलं दिसणं, भरपूर फॉलोअर्स असणं, या सगळ्याचा ताण येतो का?- त्याकडे तुम्ही कसं पाहता यावर सगळं अवलंबून आहे. ट्रोलिंग हा पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा विषय आहे. या सगळ्यापेक्षाही कलाकार म्हणून मी कितपत परिपूर्ण आहे, मी अभिनय, नृत्य, गायन या सगळ्यांत स्वतःला अजमावू शकते का, हा प्रश्न विचारून लॉकडाउनमध्ये स्वतःवर काम केलं. या क्षेत्रात काम करताना फिटनेस राखणं ही तारेवरची कसरत आहे. त्यावरही मी लक्ष केंद्रित केलं आहे. मला माध्यमांपेक्षाही वैविध्यपूर्ण काम करण्याची इच्छा आहे. संभ्रम होता; पण...ईलाक्षी गुप्ताचे आई-बाबाही डॉक्टर आहेत. तिनं डेंटिस्ट म्हणून काम करताना अभिनयात यावं की नाही, याबाबत इतर मुलींप्रमाणेच तिचेही पालक साशंक होते. याबाबत ती म्हणते, ‘माझ्या अभिनयात येण्याबद्दल पालकांची भूमिका पुराणमतवादी होती. अर्थात ते साहजिक होतं. माझी प्रामाणिक इच्छा पाहून त्यांनी होकार दिला.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3CgIDT2