आपल्या विजयाचा इशारा देण्यासाठी परमवीरचक्र सन्मानित कॅप्टन यांनी 'ये दिल मांगे मोर' हे वाक्यच का निवडलं असेल; याचं एक संभाव्य उत्तर म्हणजे; 'ते फिल्मी होते'. असं, मी नाही त्यांची प्रेयसीच त्यांना म्हणायची. विक्रम बत्रा यांना सिनेमा पाहण्याची आवड होती. त्यांचं कॉलेज जीवनातील, तसंच त्यांच्या लव्ह स्टोरीमधील काही प्रसंग हे एखाद्या बॉलिवूड सिनेमांच्या कथानकासारखेच आहेत. मग गुरुद्वारामध्ये आपल्या प्रेयसीबरोबर फेरे घेण्याचा प्रसंग असो किंवा ब्लेडने अंगठा कापून रक्ताने भांग भरण्याचा प्रेमळ प्रसंग असो. जम्मू काश्मीरमध्ये एका चकमकीत निडरपणे शत्रूच्या दिशने धावत जाऊन त्यांना यमसदनी पाठवणे; या प्रसंगातून त्यांची निष्ठा झळकल्याशिवाय राहत नाही. १९९९ साली वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी केलेली कामगिरी ही इतिहासाच्या पानांवर नक्कीच सुवर्ण कुंचल्याने लिहिली गेली आहे. एकीकडे त्यांची ही शौर्यगाथा आणि दुसरीकडे त्यांची हृदयाला भिडणारी प्रेम कहाणी 'शेरशाह' सिनेमात दिग्दर्शक विष्णू वर्धनने चित्रबद्ध केली आहे. विष्णूचा हा पहिला हिंदी सिनेमा आहे. यापूर्वी त्याने अनेक तमिळ सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा जितका प्रेमाची साक्ष देणारा आहे तितकाच तो कर्तव्यपूर्ण बलिदानाचे मूर्त रुप दाखवणारादेखील आहे. 'ये दिल मांगे मोर' या वाक्याप्रमाणे तो पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा आहे. कारण, यानिमित्तानं सीमेवर असणाऱ्या सैनिकांना युद्धजन्य परिस्थिती प्रसंगी प्राणाची आहुती देऊन निश्चित करण्यात आलेल्या कार्याची, मिशनची पूर्तता कशी करावी लागते; याचा दृश्य स्वरुपातील अनुभव या सिनेमातून घेता येतो. 'शेहशाह'ची अर्थात कॅप्टन विक्रम बत्रा यांची गोष्ट सिनेमात चोख दाखवण्यात आली आहे. पण, दिग्दर्शकानं सिनेमातील गाण्यांना आवर घालायला हवा होता. देशभक्तीपर गाणी वगळल्यास इतर गाण्यांच्या ऐवजी वास्तविक प्रसंगांच्या आधारे गोष्ट सांगितली असती; तर ती अधिक प्रासंगिक आणि सिनेमासाठी प्रभावी ठरली असती. आपल्या 'विक्रम' या नावाप्रमाणेच विक्रमाची व्याख्या त्यांनी त्यांच्या कामगिरीतून सैन्य दलासमोरच नव्हे तर संपूर्ण देशासमोर मांडली; असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्यापुढे पाकिस्तानचे सैन्यही झुकले होते. 'शेरशहा' हे बत्रा यांचं मोहिमेतील कोड नेम होतं. ७ जुलै १९९९ डेल्टा कंपनीबरोबर कारगिल युद्धात पॉइंट ४८७५ वर बत्रा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीनं शत्रूच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. हा सर्व रोमांचक थरार अंगावर काटा आणणारा आहे. तसंच भारतीय सैन्याचं शौर्य पाहून अभिमानानं ऊर भरुन आणणारा आहे. या अनुभवांसाठी दिग्दर्शक विष्णू वर्धन आणि सिनेमॅटोग्राफर कमलजीत नेगी यांना विशेष श्रेय द्यायला हवं. युद्धाचा माहोल अत्यंत समर्पकपणे त्यांनी पडद्यावर जिवंत केला आहे. यात कलादिग्दर्शकाच्या कामाचा वाटादेखील मोठा आहे. एकंदरच दिग्दर्शकीय पातळीवर कलात्मकदृष्ट्या आणि विविध तांत्रिक बाबींमध्ये सिनेमा उजवा आहे. कारगिल लढाईत सर्वात कठीण मोहीम फत्ते करणाऱ्या या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेची नस अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं अचूक पकडली आहे. 'शेरशाह'मधील त्याचं काम त्याच्या आजवरच्या अभिनयप्रवासातील सर्वोत्तम ठरलं आहे. संपूर्ण सिनेमाभर त्यानं बत्रा यांची भूमिका चोख साकारली आहे. सिनेमाच्या पूर्वार्धापासून उत्तरार्धापर्यंत बत्रा यांच्या व्यक्तिमत्वात येणारी परिपक्वता सिद्धार्थनं त्याच्या अभिनयात संतुलितपणे परावर्तित केली आहे. अभिनेत्री नंदेखील डिंपल चिमा अर्थात बत्रा यांच्या प्रेयसीची भूमिका सहजतेनं साकारली आहे. सिनेमातला अखेरचा युद्धाचा प्रसंग तर संपूच नये असं वाटतं. इतकं रोमांचक चित्रण संपूर्ण चित्रपटात रेखाटलं आहे. म्हणूनच सिनेमातल्या बत्रा यांच्याच संवादाप्रमाणे त्यांची ही शौर्यगाथा 'ये दिल मांगे मोर' म्हणत पुन्हा पुन्हा बघावाशी वाटते. सिनेमा : शेरशाह निर्मिती : करण जोहर, अपूर्व मेहता, शब्बीर बॉक्सवाला दिग्दर्शक : विष्णू वर्धन लेखन : संदीप श्रीवास्तव कलाकार : , कियारा आडवाणी छायांकन : कमलजीत नेगी संकलन : ए. श्रीकर प्रसाद ओटीटी : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ दर्जा : साडे तीन स्टार
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yLWPB4