मुंबई : येत्या १५ ऑगस्टपासून राज्यातील मॉल, हॉटेल आणि दुकाने आठवड्यातील सातही दिवस रात्री १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने जाहीर केला. त्यामुळे दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु राज्यातील धार्मिक स्थळे, नाट्यगृहे आणि सिनेमागृहे बंदच राहणार आहेत. सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे मनोरंजन विश्वातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ अभिनेते यांनी उपरोधीकपणे सरकारच्या या निर्णयाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी फेसबुकवर तशा आशयाची पोस्टही लिहिली आहे. प्रशांत दामले यांनी काय लिहिले प्रशांत दामले यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. यात त्यांनी लिहिले की, 'राज्यातील हॉटेल्स मालकांचे, रेस्टॉरंट मालकांचे, जिम मालकांचे, मॉल्स मालकांचे हार्दिक अभिनंदन. मोगॅम्बो खुश हुवा! म्हणजे आता हळूहळू नाट्यगृह, सिनेमागृह उघडण्याचा शेवटचा (अनावश्यक) टप्पा लवकरच येईल, अशी आशा बाळगू या. आता काळजी घ्यायलाच हवी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार...' अशी उपरोधिक पोस्ट लिहित प्रशांत दामले यांनी सरकारला उपरोधिक टोला लगावला. करोनामुळे राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध शिथील करताना राज्य सरकारने मनोरंजन सृष्टीला डावलेले असल्याने अनेक कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाट्यगृहांमध्येच केवळ करोना आहे का? असा सवाल उमेश कामतने सरकारला विचारला होता. आपल्या सभोवताली पाहिले तर सर्व गोष्टी सुरू होत आहेत. फक्त नाट्यविश्वच थांबले आहे. फक्त नाटकाच्या थिएटर्समध्येच करोना आहे का, असा सवाल त्याने उपस्थित केला होता. कलाकारांना कायमच दुजा भाव सरकार देत असल्याबद्दल खंतही अनेक कलाकारांनी व्यक्त केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3CKDsuW