Full Width(True/False)

'ओ शेठ' गाण्यावरून नवा वाद, गायकानेच केली गाण्याची चोरी?

मुंबई- काही महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारं गाणं '' सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. 'ओ शेठ' गाण्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं. प्रत्येक समारंभात वाजणाऱ्या या गाण्याने प्रत्येकाला आपल्या तालावर थिरकायला भाग पाडलं. परंतु, आता या गाण्याची चोरी झाल्याचा आरोप गाण्याच्या संगीतकारांनी केला आहे. 'ओ शेठ' हे गाणं उमेश गवळी यांनी गायलं असून त्याचे गीतकार आणि संगीतकार प्रणिकेत खुणे आणि संध्या केशे आहेत. प्रणिकेत आणि संध्या यांनी मिळून गाण्याची निर्मिती केली आहे. परंतु, गाण्याचे गीतकार आणि संगीतकार असूनही आमच्याच युट्यूब चॅनेलवर उमेश यांनी कॉपीराइटचा दावा केल्याने आमचं आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे, अशी तक्रार प्रणिकेत आणि संध्या यांनी केली आहे. संध्या आणि प्रणिकेत यांनी आपली आपली बाजू मांडण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे. एक लाइव्ह सेशन घेत संध्या म्हणाल्या, 'आमच्या गाण्याने सगळ्यांना वेड लावलंय. गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे गाणं आम्ही लिहिलंय. मात्र गाणं चोरून त्याची निर्मिती करण्यात आली आणि ते प्रदर्शितही करण्यात आलं. त्यावर आम्ही संबंधितांना या गोष्टीची जाणीव करून दिली. परंतु, त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही. उलट आमच्या युट्युब चॅनेलवर कॉपीराइट आल्याने युट्यूबकडून आमच्यावर स्ट्राइक आला आहे. त्यामुळे आमचं प्रचंड नुकसान होत आहे.' फेसबुक लाइव्ह करताना संध्या यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. तर गाण्याचे गायक असलेले उमेश यांनी त्यांची बाजू मांडत म्हटलं, 'या गाण्याचा कुणी एक व्यक्ती मालक नाही. आम्ही तिघांनी मिळून गाण्याची निर्मिती केली. मी हे गाणं गाणार हे कळाल्यानंतर त्यांनी मला संपर्क केला. मला या गाण्यासाठी कोणतंही मानधन मिळालेलं नाही. ऑडिओ त्यांच्या युट्यूब चॅनेलवर आणि व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करायचं ठरलेलं होतं. मग आता यावरून वाद का निर्माण झालाय.' मी हे गाणं त्यांना पाठवल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत, असं उमेश यांनी म्हटलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o1uEvE