Full Width(True/False)

याला 'डिजिटल इंडिया' म्हणायचं का?, प्रत्येक पाचपैकी चार व्यवहार चिनी मोबाइलद्वारे

वृत्तसंस्था, नवी दिल्ली देशातील डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेला अप्रत्यक्षरित्या चीनने हातभार लावला आहे. ‘फोन पे’च्या एका अहवालानुसार देशात दैनंदिन होणाऱ्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी बहुसंख्य व्यवहार ‘टॉप’ पाच ब्रँडच्या हँडसेटवरून होत असून, पैकी चार चिनी आहेत. यंदा सप्टेंबरपासून डिजिटल पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण हँडसेटमध्ये जवळपास ४५ टक्के हँडसेट ‘शाओमी’ आणि ‘विवो’ या कंपन्यांचे आहेत. ही सर्व माहिती ‘फोन पे’च्या ‘पल्स रिपोर्ट’मध्ये नमूद करण्यात आली आहे. मागील तिमाहीमध्ये ‘फोन पे’चे ८.०७ कोटी वापरकर्ते ‘शाओमी’चा हँडसेट, ६.५३ कोटी ‘विवो’ आणि ६.१३ कोटी ग्राहक ‘सॅमसंग’च्या हँडसेटचा वापर करीत होते. या तीन अव्वल ब्रँडशिवाय ‘फोन पे’चे ४.२१ कोटी ग्राहक ‘ओप्पो’ आणि २.४२ कोटी ग्राहर ‘रिअलमी’चे हँडसेट वापरत असल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ ‘डिजिटल पेमेंट’साठी ज्या स्मार्टफोनचा वापर प्रामुख्याने केला जातो, त्यामध्ये ‘ओप्पो’ चौथ्या आणि ‘रिअलमी’ पाचव्या स्थानावरील ब्रँड असल्याचे दिसून आले आहे. ‘शाओमी’चे यूझर सर्वाधिक देशातील ४५ टक्के ‘यूपीआय’ व्यवहार ‘फोन पे’च्या माध्यमातून होत असल्याचे दिसून आले. ‘फोन पे’चा ताबा सध्या ‘वॉलमार्ट’कडे आहे. ३२ कोटी ग्राहक असणाऱ्या ‘फोन पे’कडून देशातील ७२६ पैकी ७२० जिल्ह्यांतून डिजिटल पेमेंटची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने चिनी ब्रँडच्या स्मार्ट फोनद्वारे वापरण्यात येणारा डेटा आणि वापराची माहिती कंपन्यांना देण्याची सूचना केली आहे. जेणेकरून या चिनी कंपन्यांवर भविष्यात नजर ठेवणे शक्य होणार आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्लस अहवाला’नुसार ‘फोन पे’चा वापर करणाऱ्या एकूण ग्राहकांपैकी २५ टक्क्यांहून अधिक ग्राहक ‘शाओमी’चा स्मार्टफोन वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यापाठोपाठ २० टक्के ग्राहक ‘विवो’चा वापर करतात. मात्र, सप्टेंबरमध्ये एक नवा ट्रेंड समोर आला आहे. ‘शाओमी’द्वारे ‘फोन पे’ वापरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबरमध्ये ६.४ टक्के ग्राहकांनी ‘शाओमी’च्या स्मार्टफोनचा वापर केला. त्याच वेळी ‘रिअलमी’ (१७.८ टक्के), ‘वनप्लस’ (१७ टक्के) आणि ‘विवो’च्या स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांच्या (११.२ टक्के) संख्येत वाढ झाली आहे. एका अंदाजानुसार देशातील अर्ध्याहून अधिक स्मार्टफोन बाजारपेठेवर ‘विवो’, ‘ओप्पो’, ‘शाओमी’ आणि ‘वनप्लस’चे अधिराज्य आहे. चिनी स्मार्टफोनवरून होणारे आर्थिक व्यवहार ब्रँड प्रमाण (टक्के) रिअलमी १७.८ वनप्लस १७ विवो ११.२ शिओमी ६.४ (स्रोत : फोन पे पल्स अहवाल) ‘यूपीआय’ व्यवहार करणारे ग्राहक ब्रँड ग्राहकसंख्या (कोटींत) शाओमी ८.०७ विवो ६.५३ सॅमसंग ६.१३ ओप्पो ४.२१ रिअलमी २.४२ (स्रोत : फोन पे पल्स अहवाल)


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3E0nlJd