साधारण पन्नास आणि साठच्या दशकात ब्रूस लीच्या अॅक्शन सिनेमांनी धुमाकूळ घातला होता. आजही त्या सिनेमांचं गारुड जगभरातील सिनेप्रेमींवर आहे. त्या नंतर जॅकी चॅननं अशा सिनेमांच्या शर्यतीत नवा उच्चांक गाठला. हॉलिवूडमध्ये आजवर अगणित अॅक्शन सिनेमे बनले आहेत आणि आजही बनत आहेत; पण ब्रूस ली आणि जॅकी चॅन यांनी मार्शल आर्टला सिनेमाच्या कथानकाचा महत्त्वाचा भाग बनवत दर्जेदार सिनेमे दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनेता बॉलिवूडमध्ये एकामागे एक अॅक्शनपट करतोय. या सिनेमांची ब्रूस ली आणि जॅकी चॅनच्या सिनेमांबरोबर तुलना होणार नाही; परंतु भारतीय सिनेविश्वाच्या पटलावर खऱ्या अर्थानं मार्शल आर्टला सिनेमात एकसंध बांधण्याचं काम आजच्या घडीला विद्युत जामवाल करतोय. ‘सनक’ही त्याच पठडीतला सिनेमा. सिनेमात मारधाडीचे प्रसंग खचाखच भरलेले आहेत; परंतु कथानक तितकं प्रभावी लिहिलेलं नाही. सिनेमातील बऱ्याच नाट्यमय दृश्यांना कात्री लावली असती, तर सिनेमा अधिक प्रभावी झाला असता, असं वाटतं. कथानकाचा नायक विवान (विद्युत जामवाल) हा एमएमए (मिक्स मार्शल आर्ट) ट्रेनर आहे. त्याची बायको अंशिका () वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल असते आणि तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही होते. ती लवकरच घरी जाणार असते; पण त्या वेळी रुग्णालयात काही आतंकवादी घुसतात. ते रुग्णांसोबत कर्मचाऱ्यांनाही ओलीस ठेवतात. अंशिकाही त्या आतंकवाद्यांच्या ताब्यात असते; त्या वेळी रुग्णालयाच्या इमारतीत विवान हजर असतो. तिथं घडलेला विघातक प्रकार त्याच्या लक्षात येतो आणि बायकोला वाचवण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. रुग्णालयात दाखल झालेल्या आतंकवाद्यांशी तो एकटा भिडतो. हा सर्व मारधाडीचा खेळ पाहणं मनोरंजक आहे. विवान बायकोला वाचवतो का? रुग्णालयात आतंकवादी का आले आहेत? त्यांच्या काय मागण्या आहेत, या सगळ्याची उत्तरं सिनेमात मिळतील. सिनेमात ७० टक्के मारधाड असलेले प्रसंग आहेत. अॅक्शन डिरेक्टर, फाइट मास्टर आणि विद्युत जामवाल यांचं कौतुक करायला हवं, की त्यांनी अत्यंत शिताफीनं सर्व अॅक्शन दृश्यं चित्रित केली आहेत. मार्शल आर्ट आणि विद्युतच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा पर्वणी आहे. अॅक्शन प्रसंगांमध्ये रुग्णालयातील साधनसामुग्री, वैद्यकीय यंत्रणा, मशिनरी आदींचा अचूकपणे समावेश करण्यात आलाय. सिनेमातील मारधाड असलेल्या प्रसंगांच्या बाबतीत सर्व ठीकठाक असताना सिनेमाचं कथानक मात्र तितकं रंजक नाही. पुढं काय घडणार याचा अंदाज अगोदरच लागतो. परिणामी, सिनेमाची बांधणी आणि पटकथा फोल ठरते. विद्युत जामवालसह रुक्मिणी मैत्रा, आणि यांचा अभिनय उत्तम आहे. सिनेमात नेहा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तिनं वाट्याला आलेलं काम चोख केलं आहे; परंतु दिग्दर्शकानं तिच्या अभिनय कौशल्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीनं करणं अपेक्षित होतं. सिनेमा चकाचक बनला आहे. छायांकनही आखीवरेखीव आहे. सिनेमातील अॅक्शन दृश्य अधिक प्रभावी दिसण्यात सिनेमॅटोग्राफीचंही तितकंच योगदान आहे. बाकी सिनेमा पाहण्याचा निर्णय हा तुमचा आहे. सिनेमा : सनक निर्मिती : विपुल शहा दिग्दर्शन : कनिष्क वर्मा लेखन : आशिष वर्मा कलाकार : विद्युत जामवाल, रुक्मिणी मैत्रा, चंदन रॉय सन्याल, नेहा धुपिया संकलन : संजय शर्मा छायांकन : प्रतीक देवरा ओटीटी : डिझ्ने प्लस हॉटस्टार दर्जा : २.५ स्टार
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Ga2zsw