पुणे टाइम्स टीम राज्यात चित्रपटगृहं पुन्हा सुरू झाल्यानं सिनेसृष्टीत आनंदाचं वातावरण आहे. त्या आनंदात सोमवारी भर पडली. ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ दिल्लीत झाला. यास सोहळ्यात अनेक मराठी कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ‘’ हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट’, तर ‘बार्डो’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली सिनेविश्वातल्या जाणकार मंडळींच्या समितीनं या चित्रपटांचं परीक्षण केलं होतं. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटा’सह ‘सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन’ हा पुरस्कार नीलेश वाघ आणि सुनील निगवेकर यांना प्राप्त झाला. या यशाबद्दल निर्माते मंगेश कुलकर्णी म्हणाले, ‘राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप मोठा आहे, यासाठी प्रेक्षक, सहनिर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांचे मनापासून आभार. आता चित्रपटगृहं सुरू होत आहेत आणि पुन्हा एकदा प्रेक्षक मराठी चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा आहे.’ रोहन प्रधान आणि रोहन गोखले निर्मित ‘बार्डो’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ हा पुरस्कार मिळाला. या विषयी दिग्दर्शक भीमराव मुडे म्हणाले, ‘राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं हे दिग्दर्शकाचं स्वप्न असतं. चित्रपटाची संपूर्ण टीम या पुरस्काराची मानकरी आहे. आपल्या कलाकृतीवर विश्वास ठेवण गरजेचं आहे. त्यातूनच सकारात्मक गोष्टी घडत असतात. इतक्या प्रयोगशील आणि उत्तम चित्रपटातून आपली निवड होणं, हे अभिमानास्पद आहे.’ या चित्रपटातल्याच ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सावनी रवींद्रचा सन्मान करण्यात आला. यांचाही गौरव!मराठी सिनेविश्वात सध्या आनंदाचं वातावरण आहे. ‘त्रिज्या’ या चित्रपटासाठी मंदार कमलापूरकर यांना सर्वोत्कृष्ट ध्वनीसंकलनाचा पुरस्कार मिळाला, तर ‘पिकासो’ आणि ‘लता भगवान करे’ या चित्रपटांना विशेष उल्लेखनीय म्हणून गौरवण्यात आलं. ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह नॉन फिचर फिल्म’ म्हणून ‘जक्कल’ या चित्रपटाला, तर ‘’ या लघुपटाला ‘नॉन फिचर फिल्म’ विभागात राज मोरेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘कस्तुरी’नं पटकावला. विजेते म्हणतात...आनंदाचा दिवस आहे. ‘आनंदी गोपाळ’च्या संपूर्ण टीमचं हे कर्तृत्व आहे. मराठी चित्रपटासाठी आज गौरव दिन आहे, कारण यंदाही राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटाचा गौरव केला जात आहे. मराठी चित्रपटसृष्टी एक कुटुंब आहे आणि आपण स्वतःला पदोपदी सिद्ध करत आहोत याचा अभिमान आहे. - , दिग्दर्शक (आनंदी गोपाळ) ज्या गाण्यासाठी मला पुरस्कार मिळाला आहे, ते गाणं म्हणजे चित्रपटातल्या परिस्थितीवर एका आईचं मनोगत आहे. लग्न होण्याआधी मी हे गाणं गायलं आणि लग्न झाल्यानंतर एका आईच्या भूमिकेत असताना मी हा पुरस्कार स्वीकारते आहे. आई होण्याअगोदरच त्या गाण्यातून एक वेगळा अनुभव मला मिळाला आहे. हा पुरस्कार मी माझ्या मुलीला समर्पित करते. मी आई होण्याच्या उंबरठ्यावर असताना मला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कौतुकाची थाप मिळत असतानाच जबाबदारीची जाणीवसुद्धा या पुरस्कारानं करून दिली. - , सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (बार्डो) नॉन फिचर फिल्म विभागात ‘जक्कल’ या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाच या प्रयोगाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली याचा आनंद झाला. पुरस्कार मिळाल्यानं सगळ्या टीमचा आनंद द्विगुणित झाला आहे. लवकरच ही कलाकृती रसिकांसमोर येईल. इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्म स्वरूपातील हा ७२ मिनिटांचा माहितीपट असल्यानं तो रसिकांसाठी ओटीटीवर येणार आहे. - विवेक वाघ, निर्माते-दिग्दर्शक (जक्कल ः सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म) आमच्या मेहनतीचं चीज झालं. स्वत: लताजींनी हा पुरस्कार स्वीकारला तो क्षण अतिशय अभिमानाचा होता. त्यांची गोष्टच प्रेरणादायी आहे आणि हा त्यांच्या जीवनपटाचा गौरव आहे. आनंदाच्या या क्षणांचं शब्दांत वर्णन करणं कठीण आहे. लवकरच ही कलाकृती रसिकांसमोर येईल, असा विश्वास आहे. - नवीन देशबोनिया, दिग्दर्शक (लता भगवान करे ः विशेष उल्लेखनीय सिनेमा) ‘त्रिज्या’ या कलाकृतीकरिता ध्वनी संकलनासाठीचा पुरस्कार स्वीकारताना आनंद वाटत होता. पुरस्कार जाहीर झाला तेव्हा सगळीच अनिश्चितता होती. हा सोहळा कसा होईल याबाबत साशंक होतो. अखेर दिल्लीतच सोहळा होऊन उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं याचा आनंद शब्दात सांगणं कठीण. या सोहळ्यानिमित्त मराठीतल्या कलावंतांसह इतर प्रादेशिक भाषांतील कलाकृतींच्या यशामागे असणारी मराठी माणसंही भेटली याचं समाधान आहे. - मंदार कमलापूरकर (त्रिज्या ः सर्वोत्कृष्ट ध्वनीसंकलन) सनी चौहान या सफाई कामगाराच्या मुलाची गोष्ट आम्ही ‘कस्तुरी’ या लघुपटात मांडली. त्यावर आधी ‘पोस्ट मॉर्टेम’ हा लघुपट केला होता. त्याला फीचर फिल्मचं स्वरूप दिलं आणि राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटल्यानं टीमच्या मेहनतीची दखल घेतली गेली. विशेष म्हणजे, आठ महिला या कलाकृतीच्या निर्मात्या आहेत याचा आनंद वाटतो. अनिश्चिततेच्या काळात प्रत्यक्षात हा पुरस्कार मिळाल्यानं पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली आहे. - विनोद कांबळे, दिग्दर्शक (कस्तुरी ः सर्वोत्कृष्ट बालचित्रपट) (संकलन ः कल्पेशराज कुबल, प्रसाद पवार, सुरज कांबळे)
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ChL1s7