Full Width(True/False)

आईकडून काय शिकलास? विराजस कुलकर्णी म्हणतो; अभिनयाबद्दल ती फारसं बोलत नाही पण...

लेखक-दिग्दर्शकाला सुट्टी नाही... अभिनेता म्हणून काम करताना तुझ्यातल्या लेखक-दिग्दर्शकाला सुट्टी असते का, असं विचारताच विराजस म्हणाला, ‘आजिबात नाही. थिएटरमध्ये आम्ही जे करतो त्यात अनेकदा मी नाटक लिहिलेलं-बसवलेलंही असतं. अभिनय करताना लेखक-दिग्दर्शक बंद ठेवणं माझ्यासाठी अवघड आहे. नाटक बसवताना आपला कल हा अभिनयापेक्षा सर्वांगिक आहे, असं जाणवलं. अभिनय-लेखनासह स्टोरी टेलिंगमध्ये मला खूप रस आहे. सुरुवातीला आम्हीच लिहिणं, दिग्दर्शन करणं आणि काम करणं असं काम चालायचं. अभिनय करतानाही संकलन डोक्यात सुरू असतं. प्रेक्षक समोर असण्याची सवय लागल्यानं कॅमेऱ्यासाठी लिहितानाही तशी सवय लागली. टीव्हीमुळे केवळ अभिनेता म्हणून दिसत असलो, तरी लेखक-दिग्दर्शकाचा आवाज बंद ठेवणं अवघड जातं. तरी त्याचा उपयोग होतो.’ रंगभूमीचा फायदाच...प्रायोगिकचा दिग्दर्शक ते मालिकेचा नायक या प्रवासाबद्दल विराजस म्हणतो, ‘स्टेजवरच्या कलाकाराला नेहमीच लाइव्ह संवादाची सवय असते. कॅमेऱ्यासाठी आपण अभिनय करतोय, हे लक्षात ठेवावं लागतं. अभिनेता म्हणून दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे, ते समजून घेत मी काम करायला सुरुवात केली. प्रायोगिक रंगभूमीपेक्षा मालिकेसाठी काम करतानाचं वेगळेपण म्हणजे कॅमेरा मूव्हमेंटसाठीच्या जागा वर्काऊट करणं शिकवलं जात नाही. कॅमेऱ्याच्या हालचालींनुसार चेहऱ्यावर विशिष्ट भावना ठेवणं, वनटेक दृश्य असोत त्यामुळे रंगभूमीच्या कामाचा उपयोग होतोच. सेटवर सगळ्यांचाच अनुभव माझ्यापेक्षा जास्त होता. त्यामुळे शहाणा मुलगा होत काम केलं. सगळेच रंगभूमीची पार्श्वभूमी असलेले कलाकार सोबत असल्यानं ही भूमिका करताना मजा येत आहे. मनोरंजन आणि प्रबोधन अशा दोन्ही अंगानं मालिका या माध्यमाकडे मी पाहतो.’ प्रक्रिया समजून घेतो...मी आतापर्यंत स्वतःसाठी लिहिलेल्या भूमिका थोड्या वेगळ्या प्रकारच्या होत्या. चांगला आणि गुणी मुलगा साकारायची संधी मिळाली नव्हती. या भूमिकेला कसं स्वीकारलं जाईल याची कल्पना नव्हती. पडद्यावर स्वतःला पाहणं, आपला आवाज कसं आहे, हे पाहणं नवा अनुभव असतो. त्यामुळे तिऱ्हाईताकडून मिळणारी प्रतिक्रिया महत्त्वाची असते. अभिनेता म्हणून तुमचा आलेख कुठवर आलाय हे त्यातून कळतंय. घरी आई-बाबा किंवा आजोबा यांच्याकडून वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात. सोशल मीडियावरचा प्रतिसाद पाहून तो विचारात घ्यावा लागतो आणि समजूनही घ्यावा लागतो. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया किती मनावर घ्यायच्या आणि नाही, या गोष्टीही कळल्या. तुमच्या भूमिकेवरून अनेकदा तुमच्याविषयी मतं बनवली जातात. हे सगळं पाहत समजून घेणं गरजेचं असतं.’ ती मल्टीटास्कर प्रसिद्ध अभिनेत्री आणि आई मृणाल कुलकर्णी यांच्याकडून काय टीप्स मिळतात असं विचारताच विराजस म्हणाला, ‘तिच्या अनुभवाचा फायदा इंटरेस्टिंग पद्धतीनं होतो. अभिनयाबद्दल ती फारसं बोलत नाही पण सेटवर स्वतःचं वेळापत्रक कसं सांभाळायचं याच्या छान टीप्स ती देते. सेटवरच्या गडबडीत आपण कसं उत्स्फूर्त असणं गरजेचं आहे, मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसं जपायचं, आपण वेगळं काय करत राहायचं, हे सगळं ती सांगते. लहानपणापासून चार्ली चॅप्लीन आणि पुलं या दोन गोष्टी खूप जवळच्या आहेत. एवढी वर्षं आईनं इंडस्ट्रीत काढली आहेत, की ते नुसतं पाहणंही खूप काही शिकवणारं आहे. दिग्दर्शनाकडे ती वळली तेव्हापासून घरीही फिल्मस्कूल असल्यासारखं आम्ही चर्चा करायचो. या सगळ्यांतही तिनं सगळे ताणतणाव आणि वर्कलोड बाजूला ठेवून आईची भूमिका निभावणं ती कसं साधते, हे तिलाच माहीत. मल्टीटास्किंग तिच्याकडून शिकलोय असं म्हणता येणार नाही; पण मी प्रयत्न करतो आहे. मालिका संपल्यावर मी लिहीन ती दिग्दर्शन करेल किंवा मी तिच्यासाठी दिग्दर्शन करीन, हा पर्याय मला अधिक आवडेल.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3v34JFe