Full Width(True/False)

'राजे...तुम्ही जाऊ नका ', भूषण प्रधानच्या पोस्टवर प्रेक्षकांच्या भावुक कमेंट्स

मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका '' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवटचा भाग २२ नोव्हेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे. परंतु, जेव्हा मालिका बंद होणार आहे हे अभिनेता याला कळालं तेव्हा ते अनपेक्षित असल्याचं त्याने म्हटलं. भूषण मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. भूषणने मालिकेचा निरोप घेताना चाहत्यांसोबत एक पोस्ट शेअर केली आहे. भूषण त्याची भूमिका इतक्या उत्कृष्टरित्या साकारत आहे की प्रेक्षकांना खरंच शिवाजी महाराजांना पाहिल्याचा भास होतो. त्यामुळेच की काय नेटकरी भूषणच्या या पोस्टवर मालिका बंद ना करण्याची विनंती करत आहेत. तर काही नेटकरी भूषणची पोस्ट पाहून भावुक होत आहेत. भूषणने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, 'येतो आम्ही. मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस. इतक्या लवकर? अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं! चित्रपट, वेबसीरिज ह्यांचं जरा बरं असतं. अमुक एक दिवसांनी आपल्याला ह्या पात्राची साथ सोडायची आहे हे माहीत असतं. मालिकेचं तसं असेलच असं नाही. शेवटचा दिवस हा आजही असू शकतो किंवा सहा महिन्यांनी किंवा अनेक वर्षांनी. हयाआधीही ह्याचा अनुभव आल्याने कायमच सतर्क होतो. ‘भूषण, आजचा दिवस राजा म्हणून जगायला मिळतोय तो पूरेपूर जग’ स्वतःला रोज सांगायचो. मग दाढी मिशी चिकटवण्यासाठी चेहऱ्याला लावण्यात येणारा, एरवी नकोसा वाटणारा-झोंबणारा तो ‘बोरकर गम’ ही अचानक गार वाटायचा. ‘जय भवानी जय शिवाजी’ ह्या मालिकेसाठी संपूर्ण टीम खूप कष्ट घेत होती. मालिकेची दर्जेदार क्वालिटी पाहून मजेत दिग्दर्शकाला म्हणायचो, ‘आम्हाला टिव्ही मालिका सांगून आमच्याकडून वेबसीरिज बनवून घेताय’! खरच… नेमकेच भाग झाले… १०५! ह्याआधी अशी भूमिका करायला मिळाली नव्हती मात्र मिळाली ती योग्य वेळी. एक अभिनेता/ कलाकार म्हणून ही भूमिका पेलू शकतो अशाच वेळी. ‘येतोय आम्ही’ म्हणत पहिला प्रोमो रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. चांगल्या, वाईट, कुत्सित! दुसऱ्या प्रोमोपासून प्रतिक्रिया अधिक सकारात्मक होत गेल्या आणि पहिल्या एपिसोडपासूनच भरभरून प्रेम मिळत गेलं ते कायमचं. अनेकांना आवडत असताना मालिका इतक्या लवकर संपतेय ह्याचं वाईट वाटावं की प्रेक्षकांना मालिकेचा कंटाळा येण्याच्या आत मालिका संपतेय याचा आनंद? महाराजांची भूमिका करत असल्यामुळे अगदी कमी कालावाधीत बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. काही जाणीवपूर्वक तर काही अनवधानाने. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, परिस्थितीमध्ये काय बदल होतायत, येणाऱ्या अफवांमधे तथ्य असू शकते का, त्याची कारणं काय असू शकतात, असे अनेक विचार डोक्यात सुरु होते. आणि अशातच अचानक कळले की हा बाजींचाच नाही तर आपला आणि मालिकेचाही शेवटचा दिवस! धक्कादायक असूनही धक्का बसला नाही. खंबीर होतो. राजांमुळे, राजांसारखा! तयारी नव्हती, ती ह्या भूमिकेस अलविदा म्हणण्याची. काही क्षणात ह्या भूमिकेसाठी शेवटचे ऍक्शन आणि शेवटचे कट ऐकू येणार. तयारी? अजूनही नाही. डोळ्यातून अश्रू वाहणार? नाही. तू राजांच्या वेषात आहेस. राजांच्या भूमिकेत आहेस आणि राजाला रडण्याची मुभा नाही. अश्रू गाळायचे तर भूषण म्हणून स्वतःच्या वेषात, स्वतःच्या भूमिकेत! घोडखिंडीतून राजे निघाले, बाजी प्रभूंस म्हणाले, ‘येतो आम्ही’… कट! राजांच्या वेषातच सेटवर जाऊन आलो! कोणीच नव्हते तरीही सगळे होते. सगळ्या पात्रांस आठवून आलो. अलविदा म्हणून आलो. माँसाहेबांची खूप आठवण आली. आज त्या सेटवर नव्हत्या ते बरेच झाले. राजाला रडता येत नाही; पण मुलाने आईसमोर अश्रू रोखायचे ते कसे? मेकअप काढला, कपडे बदलले, घरी आलो. अश्रू न रोखता आईस सांगायचे असे ठरवले. सांगितले पण अश्रू? नाहीत. दुसऱ्या दिवशी बाबांना सांगितले. अश्रू? नाहीत! शांत बसलो. विचार केला! ह्याआधी एखाद्या भूमिकेची साथ सोडल्यावर मला रडू यायचं. मग आता का नाही? उत्तर मिळालं. “साथ सोडलीय कुठे! ज्या विचारांच्या जवळ जाऊ शकलास ते विचार जप! त्या विचारांच्या रूपाने… आहोत आम्ही”!'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3FQLLGj